माथेरानच्या इतिहासात पहिल्यांदाच शुकशुकाट, पर्यटकांच्या लुटमारीविरोधात कडकडीत बंद

पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असलेल्या माथेरान शहराने आज इतिहासात पहिल्यांदाच शुकशुकाट अनुभवला. पर्यटकांची दिशाभूल आणि लुटमारीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या कडकडीत बंदमुळे हॉटेल, ठेले, टपऱ्या आणि दुकानांचे शटर पूर्णपणे डाऊन होते. रोज पर्यटकांनी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य होते. खायला घालणारे पर्यटकच शहरात नसल्याने माथेरानचे वैशिष्ट्य असलेली माकडेही गायब झाली होती.

माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना खोटी माहिती देत घोडेचालक, हमाल, रुम्सचे एजंट आणि गाईडकडून लुटमार केली जाते. त्यांच्याकडून अवाचेसवा रक्कम उकळली जाते. याविरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. पर्यटक आले तरच माथेरानचे पर्यटन बहरेल असे सांगत या लुटमारीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने आवाज उठवला. नगरपालिका प्रशासन, वन खाते, पोलीस यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले; परंतु प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे 17 मार्च रोजी संघर्ष समितीची बैठक झाली आणि त्यांनी 18 मार्चपासून माथेरानमध्ये बेमुदत बंदची हाक दिली. त्याला हॉटेल इंडस्ट्री, दुकानदार, ई-रिक्षाचालक, टॅक्सी चालक-मालक संघटना यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला.

माथेरानला नेरळ मार्गे यावे लागते. माथेरान बंदची माहिती नसलेले अनेक पर्यटक नेरळपर्यंत आले. मात्र टॅक्सी सेवाच बंद असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. माथेरानमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आलेल्या पर्यटकांना हॉटेलमालकांनी नेरळपर्यंत नेऊन सोडले. 18 तारखेपासून पुढील मुक्कामासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलेल्या पर्यटकांचे पैसेही हॉटेलमालकांनी परत देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे आजचा माथेरानचा बंद अभूतपूर्व झाला. रोज पर्यटकांनी बहरलेल्या माथेरानमध्ये आज अक्षरशः शुकशुकाट होता.

आज तातडीची बैठक

माथेरानचे अधीक्षक सुरेंद्रसिंह ठाकूर यांनी आज माथेरान बचाव संघर्ष समितीची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना बंदवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी 19 मार्च रोजी तातडीची बैठक माथेरानमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने कर्जतचे उपविभागीय अधिकारी, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, तहसीलदार धनंजय जाधव उपस्थित राहणार आहेत. या बंदवर उद्याच्या बैठकीत नक्की तोडगा निघेल, असा विश्वास सुरेंद्रसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.