
मुंबईत दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून यातील 700 दशलक्ष लिटर पाणीचोरी होते. ही पाणीचोरी रोखण्यासाठी पाइपलाइनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कंट्रोल रूममध्येच कळेल की पाणीचोरी, गळती कुठे होते, कोणी अतिरिक्त कनेक्शन घेतले आहे. ही यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईतील अपुरा पाणीपुरवठा आणि विविध भागांत होणारी पाणीचोरी थांबवावी, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून राजहंस सिंह यांनी केली. मुंबईतील लोकसंख्या वाढत आहे त्यांना पाणीपुरवठा कसा करणार? त्यात कुर्ला, मानखुर्द, मालवणीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पाणीचोरी होते. मार्च महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यावर काय उपाययोजना करणार, असा सवाल त्यांनी केला. चर्चेत भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
गारगाई प्रकल्पासाठी चार वर्षे
मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा जास्त करावा लागणार आहे. त्यासाठी 2013 साली गारगाई प्रकल्प विकसित करण्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिले होते. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी चार वर्षे लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईला अंदाजे 440 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
समुद्रापासून पिण्यायोग्य पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा
समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करणारा पायलट प्रकल्प मुंबई महापालिका राबवणार होती. त्यासाठी महापालिकेने 400 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे 400 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मुंबईची पाणीटंचाई दूर करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्यावर हे अधिवेशन संपल्यानंतर तत्काळ आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात येऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.