मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 3 टक्क्यांची वाढ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या महामार्गावर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोलच्या रकमेत तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत, तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर ही टोल दरवाढ लागू होणार आहे. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांच्या मते टोलच्या दरांमध्ये दरवर्षी 1 एप्रिल रोजी बदल केला जातो. वाहनाच्या प्रकारानुसार ही दरवाढ लागू करण्यात येते. चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी टोल दरात 5 रुपयांची वाढ केली जाणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत. इतर श्रेणींतील वाहनांसाठी सरासरी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यांतील काही ठरावीक महामार्ग वगळता इतर रस्त्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे वाहनधारकांना खडतर प्रवासाचा कटू अनुभव घ्यावा लागतो. सरकारची अशा प्रकारे अनास्था असताना दरवर्षी सर्व महामार्गांवर टोलची दरवाढ का केली जात आहे, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून केला जात आहे.