
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा चिंतेची बाब असून 99 टक्के बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये कागदपत्रे तयार करून येतात. या घुसखोरांना आधार कार्डही अधिकृतपणे तयार करून मिळतात. महाराष्ट्रात नायब तहसीलदारांनी काही बांगलादेशींना जन्मदाखले दिले, अशी कबुली गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली.
भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात बांगलादेशींचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिह्यातही बांगलादेशी घुसखोर खोटे दाखले मिळवून राहातात, त्यांना चिपळूणमधून दाखले मिळालेत, हे निदर्शनास आणून दिले.
बांगलादेशी घुसखोरांसाठी दलाल सक्रिय आहेत. आधी कुटुंबातील एक जण येतो, मग नातेवाईकांना बोलावून घेतो. महाराष्ट्रात त्यांना कागदपत्रे मिळत नाहीत. काही प्रकरणांत जन्म प्रमाणपत्रेही महाराष्ट्रात काढल्याचे समोर आल्यानंतर नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.