बीडीडीच्या धर्तीवर बीआयटीमधील पोलिसांना घरे देण्याबाबत चाचपणी

बीडीडी चाळींच्या धर्तीवर बीआयटी चाळीतील पोलिसांना पुनर्विकासानंतर घरे देण्याच्या संदर्भात चाचपणी करण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिले. बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात आला आहे. त्यामुळे म्हाडाच्या संदर्भातील निर्णय बीआयटी चाळींना लागू करता येतील का हे तपासून घ्यावे लागेल, असे मंत्री म्हणाले.

काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंबई सेंट्रल येथे बीआयटीच्या 19 इमारती असून यामध्ये 1 हजार 552 सदनिका आहेत. त्यातील 241 सदनिका पोलिसांच्या आणि 80 सदनिका लोहमार्ग पोलिसांच्या आहेत. या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतींचा पुनर्विकास गरजेचा आहे. पुनर्विकासात रहिवाशांना किमान 500 चौरस फुटांची घरे देण्याची मागणी या वेळी केली.  बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना या चाळींमधील पोलिसांकडून घरांच्या बांधकामाचा 15 लाख रुपयांचा खर्च घेऊन पोलिसांना घरे दिली. त्याच धर्तीवर बीआयटी चाळींचा पुनर्विकास झाल्यावर या चाळीतील पोलिसांनाही घरे देण्याची मागणी अमिन पटेल यांनी केली.