
सिद्ध बाबा मंदिरात भाविकांना घेऊन जाणारी बोट धरणात उलटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सात भाविक बेपत्ता असून 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे ही घटना घडली. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. बेपत्ता लोकांमध्ये तीन महिला आणि चार मुलांचा समावेश आहे.
सर्व भाविक माताटीला धरणातील बेटावर असलेल्या सिद्ध बाबा मंदिरात चालले होते. 15 भाविकांना घेऊन बोट निघाली. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर बोटीचे संतुलन बिघडले आणि बोट पाण्यात बुडाली. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत आठ जणांना सुखरुप पाण्यातून बाहेर काढले. तर सात जण बेपत्ता आहेत.
घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे, असे शिवपुरीचे एसपी अमन सिंह राठोड यांनी सांगितले.