
पाकिस्तानातून हिंदुस्थानात आलेल्या सीमा हैदर आणि सचीन मीना या दाम्पत्याला मुलगी झाली. मंगळवारी पहाटे चार वाजता सीमाने नोएडातील कृष्णा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. हे सीमाचे पाचवे मूल आहे. यापूर्वी तिला तिच्या पाकिस्तानी पतीपासून चार मुले होती, तर पती सचिन मीनापासून हे तिचे पहिले अपत्य आहे. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. हा कुटुंबासाठी एक नवीन अध्याय आहे. आपण लवकरच बाळाचे नाव ठेवू, असे सचिन मीनाच्या कुटुंबीयाने सांगितले.
मुलीचा जन्म हिंदुस्थानात झाला आहे, त्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आपल्या संविधानात जन्माने मिळालेल्या नागरिकत्वाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे या मुलीला आपोआप भारतीय नागरिक मिळेल. सीमा हैदर आणि गुलाम हैदर यांचे लग्न 2014 मध्ये झाले. 2019 मध्ये गुलाम हैदर सीमा आणि चार मुलांना कराचीत सोडून दुबईला गेला. 2019 मध्येच, पबजी खेळत असताना सीमाची नोएडातील रबुपुरा येथील रहिवासी सचिन मीनाशी ऑनलाइन भेट झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले.