तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते; उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

नागपूरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिले. त्यानंतर गद्दार उपमुख्यमंत्री याबाबत बोलले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब बोलत असतानाही मिंधे मध्ये बोलण्याचा आणि परब यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत मिंधे जो करत होते, त्याला आक्रमकपणा नाही, तर भेदरटपणा म्हणतात, अशा शब्दांत मिंध्यांना सणसणीत टोला लगावला.विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, मिंधे आणि सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.

पत्रकारांनी यावेळी, तुम्ही आणि अनिल परब पंतप्रधानांना भेटायला गेला होता. त्याचा उल्लेख शिंदे यांनी केला असे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मिंधेना आणखी एक जबरदस्त टोला लगावला. आम्ही मोदींना भेटायला गेलो होतो, तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये बसले होते, ते आम्हाल कळलेच नाही, असे उत्तर देत मिंध्यांना जबरदस्त तडाखा देत टोला लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागपूर घटनेबाबतही प्रतिक्रिया दिली. भाजपच्या मंत्र्यांच्या मुलांनी हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामने भरवायचे आणि ते दुबईत जाऊन पाहायचे देखील. आणि इथे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेबाला व बलाढ्य सत्तेला नमवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. महाराजांच्या निधनानंतर तो औरंगजेब स्वराज्यावर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण महाराष्ट्राच्या मातीचा कणही जिंकू शकलेला नाही. महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने, छत्रपती संभाजी महाराज, रामराजे महाराज, राणी ताराराणी व असंख्य मावळ्यांनी त्याला मूठमाती दिली. थोडक्यात काय औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण तो इथल्या मातीचा कणही जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचं समर्थन कुणी शिवप्रेमी करणार नाही. त्यामुळे जर कुणी त्याचं थडगं उकरण्याची भाषा करत असेल तर डबल इंजिन सरकार काय नुसतं वाफा सोडतंय का? मुख्यमंत्र्यांनी ही कबर उद्ध्वस्त करण्यास असमर्थता दाखवली आहे. त्याला केंद्रांचं संरक्षण आहे.

केंद्र सरकार जर औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देत असेल तर तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? औरंगजेब असो अफजलखान असो हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचे तर तुम्ही आंदोलन काय करताय? मोदींकडे जा व सांगा गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब ज्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा व तो सोहळा कराल तेव्हा नितीश बाबू व चंद्राबाबूंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.