
>> डॉ. नीलम ताटके, [email protected]
समाजात अनेक प्रथा वर्षानुवर्षे चालू आहेत. त्यापैकी एक म्हणजे गोंधळ होय. गोंधळी समाज हे काम करतात. हे लोक तुळजाभवानी देवीला आपले आराध्य दैवत मानतात. गोंधळ देवीचाच घातला जातो. गोंधळी समाजही गोंधळ, पोवाडे यातून समाज जागृतीचे काम करतो.
घटस्थापनेचा पूजाविधी गोंधळी करतात, मनोरंजनही करतात. गोंधळ घालणे हे त्यांच्या उपजिविकेचे साधन आहे. त्याचा संबंध देवाच्या उपासनेशी आहे. गोंधळी विशेषकरून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांत आढळतात.
गोंधळ हा लोककलेचा एक प्रकार आहे. तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवीच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. गोंधळ घातल्याशिवाय कार्य पूर्णत्वास गेलं असे समजले जात नाही. एक बाब आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की, गोंधळ केवळ लग्न, मुंज पार पडल्यावरच नाही, तर नवीन घर घेतल्यावर, बांधल्यावरदेखील घातला जातो. एकूणच आनंददायी प्रसंगात घातला जातो.
गोंधळात विशिष्ट वाद्ये वापरली जातात ती म्हणजे संबळ आणि तुणतुणे. कुणी कुठलं वाद्य वाजवायचे हेही गोंधळींमध्ये ठरलेले असते. या गोंधळामध्ये दोन प्रकार आहेत ते काकडय़ा गोंधळ आणि संबळ्या गोंधळ. पैकी काकडय़ा गोंधळ कुठल्याही समाजाचे लोक घालू शकतात, परंतु संबळ्या गोंधळ मात्र गोंधळी समाजाचे लोक करू शकतात.
गोंधळ झाला की, देवीला नैवेद्य दाखवून गोंधळींना जेवण दिले जाते. त्यांच्या मुलांसाठीही पदार्थ दिले जातात. दक्षिणा दिली जाते. गोंधळी स्त्रीला कोरे वस्त्र भेट देतात. यातून दानाचे महत्त्व सांगितले आहे आणि आपल्या आनंदात इतरांना सामील करून घेण्याची शिकवण या प्रथेने दिली आहे.