
बुलढाण्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यात पाडकाम करताना जुनं घर अंगावर कोसळल्याने बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. शालिकराम हरिभाऊ वाळस्कर आणि योगेश शालिकराम वाळस्कर अशी मयत बापलेकांची नावे आहेत. तर सुनील एकनाथ नेमाने आणि राम दिलीप घाडगे अशी जखमींची नावे आहेत.
शेलोडी येथील दामोदर घाडगे यांचे जुने घर पाडण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी शालिकराम वाळस्कर, योगेश वाळस्कर, सुनील नेमाने आणि राम घाडगे हे काम करत होते. पाडकाम सुरू असतानाच अचानक धाब्याचे घर कोसळले. यात शालिकराम आणि योगेश यांचा ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला. तर सुनील आणि राम जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले.