Ratnagiri News – पर्यटकांसाठी करमणुकीची नवी मेजवानी! थिबा पॅलेस येथे मल्टिमीडिया शो सुरू

रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आंबा, फणस, काजू आणि ताज्या माशांबरोबर करमणुकीची नवी मेजवानी मिळणार आहे. रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक थिबा पॅलेस येथे रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो सुरू करण्यात आला आहे. हा शो उन्हाळी सुट्टीत रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेससारखी भव्य ऐतिहासिक वास्तू आणि तिथे रंगणारा थ्रीडी मॅपिंग शो डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. हा थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो 25 मिनिटांचा आहे. या शोसाठी प्रतिव्यक्ती 50 रूपये आणि 20 रूपये तिकिट दर आकारण्यात येणार आहे. मल्टीमीडिया शोमध्ये थिबा पॅलेस कसा उभा राहिला? म्यानमारच्या थिबाराजाचा इतिहास सर्वांना ज्ञात होणार आहे.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास पाहताना प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहणार आहे. त्याचबरोबर कोकणतील भारतरत्न पुरस्कार विजेत्यांचाही इतिहास मल्टीमिडिया शो सांगणार आहे. थिबा पॅलेस परिसरात सुमारे 300 प्रेक्षक बसतील इतकी आसन क्षमता आहे. थ्रीडी मॅपिंग मल्टीमिडिया शोची तिकिट विक्री थिबा पॅलेस परिसरात होणार आहे.

आज पहिल्या दिवशी एक शो दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर दोन शो दाखवण्यात येणार आहेत. सध्या हा शो मराठीत आहे. मात्र परराज्यातील प्रेक्षक आल्यास व त्यांनी मागणी केल्यास हिंदी भाषेतही मल्टिमिडिया शो दाखवण्याची सेवा उपलब्ध आहे.