
पंजाबमधील मोहालीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने एका फास्ट फूड बनवणाऱ्या कारखान्यावर छापेमारी केली. यावेळी कारखान्यातील फ्रीज उघडले असता अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. फ्रीजमध्ये कुत्र्याचे डोके आढळले. स्थानिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने या कारखान्यावर धाड टाकली होती.
कारखान्यात छापेमारी केल्यानंतर मोमोज बनवण्यासाठी कुजलेल्या भाज्या, घाण पाणी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. गेली दोन वर्षे हा कारखाना सुरू होता. या कारखान्यात दररोज एक क्विंटलपेक्षा अधिक मोमोज आणि स्प्रिंग रोल तयार केले जात होते. चंदीगड, पंचकुला आणि कालका येथे हे मोमोज आणि स्प्रिंग रोल पुरवले जात होते.
कारखान्याच्या उत्पादनांमध्ये कुत्र्याचे मांस वापरले जात आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी हे डोके पशुवैद्यकीय विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच मोमोज, स्प्रिंग रोल आणि चटणीसह अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले.
वैद्यकीय पथकाने मत्तौर येथील चिकन दुकानांवरही छापेमारी केली. या छापेमारीत दुकानातून 60 किलो दुर्गंधीयुक्त फ्रोझन चिकन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.