
चेहऱ्यावरील एक पिंपल मुलींची झोप उडवते. पण असं असलं तरी, एक मात्र खरं की मुली यावरही पटदिशी उपायही शोधून काढतात. चेहऱ्यावर कधी गालावर, हनुवटीजवळ मुरुमांचे डागही अनेकदा राहतात. अशावेळी रासायनिक सौंदर्यप्रसाधनांपेक्षा नैसर्गिक उपाय करणे हे केव्हाही श्रेष्ट मानले जाते. स्वयंपाकघरातील बटाटा सौंदर्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे त्वचेवरील जुनाट डाग कमी करण्यासाठी बटाटा हा प्रभावी ठरतो.
चेहऱ्यावर बटाटा लावण्याचे फायदे
बटाटा केवळ आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्यांसाठी देखील त्याचा वापर फायदेशीर मानला जातो. आपण बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावतो, त्यावेळी बटाट्यांमधील ब्लीचिंग गुणधर्म डाग कमी करण्यास मदत करतात. त्यात स्टार्च असते जे त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचा मऊ मुलायम बनते. बटाट्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. तसेच बटाट्यातील व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग उजाळण्यास मदत करतो.
बटाट्याचा सीरम कसा तयार करायचा?
व्हिटॅमिन ई कॅप्सूल – २
मध – १ टेबलस्पून
लिंबाचा रस – १ चमचा
बटाट्याचा रस – ३ टेबलस्पून
कापसाचा बोळा
सर्वप्रथम एक वाटी घेऊन त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल, मध, लिंबाचा रस आणि बटाट्याचा रस घालून चांगले मिसळून घ्यावे. नंतर एक कापसाचा पॅड किंवा थोडासा कापसाचा गोळा घ्या आणि तो तयार केलेल्या सीरममध्ये बुडवा आणि चेहऱ्यावर लावावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर, १० मिनिटे सुकू द्यावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा नीट धुवावा.
फक्त एका वापरानंतर तुमचा चेहरा कसा चमकतो ते पाहा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून २-३ वेळा वापरू शकता आणि चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)