
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत संबोधन करताना प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. यावेळी विरोधकांनी महाकुंभामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पंतप्रधान बोलत नसल्याने तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी यावर संताप व्यक्त केला.
पंतप्रधानांनी जे बोलले त्याला मला पाठिंबा द्यायचा होता. कुंभ आपला इतिहास, परंपरा, आपली संस्कृती आहे. पण एक तक्रार आहे की त्यांनी महाकुंभमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली नाही वाहिली. जे तरुण महाकुंभात गेले त्यांना पंतप्रधानांकडून रोजगार हवा आहे. त्या रोजगाराविषयीही त्यांनी बोलायला हवे होते पण ते बोलले नाहीत. लोकशाहीत विरोधी पक्ष नेत्याला बोलण्याचा अधिकार असतो. मात्र हे तो अधिकारही देत नाही. हा नवीन हिंदुस्थान आहे, असे राहुल गांधी म्हणाले.