
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत असून विविध भागात सोमवारी निदर्शने देखील झाली. यानंतर सोमवारी रात्री नागपुरात या निदर्शांनी हिंसक वळण घेतलं. नागपुरच्या महाल भागात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. घरं आणि दुकानांवर झालेली दगडफेक आणि काही भागात झालेल्या जाळपोळीनंतर नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करत कारवाई करावी लागली. आता संवेदनशील भागात पोलिसांच्या जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या हिंसाचाराच्या घटनेत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं मत व्यक्त केलं आहे.
काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून क्रूर शासक औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यानींही ही मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेकडून नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी आंदोलन करण्यात आलं. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं. त्यानंतर महाल परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याच भागात सायंकाळी दोन गटांमधील तरुणांमध्ये वाद झाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. नंतर घोषणाबाजी करण्यात आली आणि हळूहळू वातावरण तापत गेलं. दगडफेकीच्या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केली आणि काही गाड्या पेटवून दिल्या. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. नागपुरात उद्भवलेल्या या परिस्थितीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला आणि यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी केली. ‘नागपुरात झालेली घटना दुर्दैवी आहे. दोन समाजामध्ये तणाव आणि दगडफेक झाली. नागपूर सारख्या शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मुळात या घटनेसाठी जबाबदार कोण? शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचे काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री दोन समाजामध्ये दरी निर्माण करेल असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. कबरीचा वाद जाणूनबुजून निर्माण करण्यात आला. इतिहास तोडून मोडून पुढे आणण्याचे काम केलं गेलं. 400 वर्षापूर्वीच्या कबरीच्या प्रश्नातून काय साध्य होणार आहे. ती कबर ठेवली काय आणि नाही त्यामध्ये कुणाचा फायदा होणार आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
तसेच जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. दोन्ही समाजात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असेही ते म्हणाले.