
लटकलेल्या मालमत्ता आणि पाणी बिलाच्या रकमेवर महापालिकेने व्याज माफ केल्याने पंधरा दिवसांत जवळपास ९७ कोटींची वसुली झाली आहे. नागरिकांनी पालिकेने तयार केलेल्या सुविधा केंद्रांवर रांगा लावून मालमत्ता व पाणी बिलाची रक्कम भरली. त्यामुळे थकलेल्या पैशांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तगादा लावणारी महापालिका पंधरा दिवसांत मालामाल झाली आहे.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एकरकमी भरल्यास १०० टक्के व्याज माफी देण्यात आली होती. महापालिकेने देयके बिले वितरित केल्यानंतर १ ते १५ मार्च या पंधरा दिवसांत ९६.७४ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. ९ हजार ४०५ करदात्यांनी थकीत रक्कम भरली.
करदात्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित करदात्यांनी याचा लाभ घ्यावा आणि महापालिकेच्या विकासकामांना आर्थिक हातभार लावावा, असे करविभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले.