
श्रीवर्धन एसटी डेपोतून मुंबईला निघालेल्या दिघी-तुरंबाडी-मुंबई या एसटी बसचा स्टार्टर जळाल्याने बसमधून धुराचे मोठे लोट उठले. बस पेटली या भीतीने गाडीतील प्रवाशांनी आपले प्राण वाचवण्यासाठी अक्षरशः खिडकीतून उड्या मारल्या. ही घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावातील बाजारपेठेत घडली. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
भंगारात काढाव्यात अशा गळक्या एसटी बसेस श्रीवर्धन आगारात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही आगारप्रमुख आणि पेण येथील जिल्हा नियंत्रक याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत. त्याचाच फटका आज प्रवाशांना बसला. श्रीवर्धन डेपोची दिघी-तुरुंबाडी-मुंबई ही एसटी बस म्हसळ्यातील मेंदडी गावात येताच या बसमधून अचानक धुराचे लोट येऊ लागले. बस पेटली.. बस पेटली असा एकच गलका झाला आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. चालकाने हा धूर का आला याची पाहणी केली असता बसचा स्टार्टर जळाल्याचे कळले. या घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
तीच बस पुन्हा मुंबईकडे रवाना
श्रीवर्धन एसटी आगाराचे व्यवस्थापक मणियार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बसचा स्टार्टर जळाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. ही बस पुन्हा श्रीवर्धन स्थानकात आणल्यानंतर नवीन स्टार्टर बसवून बस मुंबईकडे रवाना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.