शेवाळ, तवंग, दुर्गंधी, दारूच्या बाटल्यांचा खच , खर्डीच्या पाझर तलावाची झाली कचरपट्टी

खर्डीचे वैभव असलेल्या शिवकालीन पाझर तलावाची अक्षरशः कचरपट्टी झाली आहे. शेवाळ, तवंग, गावातील कचरा तलावात जात असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे तलावाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मद्यपींची टोळकी रोजच या परिसराचा ताबा घेऊन ओल्या पार्त्या झोडतात. त्यानंतर रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून देतात. त्यामुळे दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

गावात इतका मोठा तलाव असूनही गाळ काढून पाणी वापरायोग्य करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. हा तलाव तीन ते चार एकर जागेत आहे, परंतु तलावाला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात तलाव ओव्हरफ्लो होतो. शेवाळ पसरल्याने पाण्यावर हिरवा तवंग आला आहे. तसेच तलावात कचरा, निर्माल्य कुजल्याने या पाण्याला उग्र दुर्गंधी येत आहे.

पाणीटंचाई दूर होईल 

खर्डी गावाचे सौंदर्य वाढवायचे असेल तर तलावाच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकावे. दरवर्षी वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी या ठिकाणी एखादा प्रकल्प राबवून पाण्यावर प्रक्रिया करून ते वापरण्यायोग्य करावे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई दूर होईल. तसेच तलावाला संरक्षक भिंत बांधावी, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख भाई देहरेकर यांनी सांगितले.