मिंध्यांना डम्पिंगचा प्रश्न सोडवता आला नाही, ठाणे पालिकेची अब्रू गेली; कचरा झाकण्याची वेळ!

अनेक वर्षे सत्तेत असलेल्या मिंध्यांना शहरातील कचऱ्याच्या डम्पिंगचा प्रश्न सोडवता न आल्याने ठाणे पालिकेची अबू गेली आहे. शहरात जागोजागी साचलेला कचरा झाकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कचरा उचलला न गेल्याने संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चौकाचौकात कचऱ्याचे महाकाय ढीग लागल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.

ठाणे शहरात गेल्या आठवड्यापासून कचरा उचलला जात नसल्याने कचरा संकलनाचे व्यवस्थापन संपूर्णपणे कोलमडले आहे. सीपी तलाव या ठिकाणी कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे, तर वागळेमध्ये कचरा टाकण्याला विरोध करण्यात आला आहे. दुसरीकडे आतकोनीमध्ये कचरा वाहून नेण्यासाठी जास्त कालावधी जात असल्याचे कारण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र या सर्व गोंधळात शहरात रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. मात्र आता शहरातील सोसायट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कचरा वाहून नेणारी घंटागाडी सोसायट्यांमध्ये आली नसल्याने कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न सोसायट्यांमधील नागरिकांना पडला आहे.

घरातच साठवला जातोय कचरा
सोसायट्यांमधील आवारात कचऱ्याचे ड्रम ओसंडून वाहत आहेत, तर इमारतींमधील नागरिक बाहेर रस्त्यावर कचरा टाकू शकत नसल्याने हा कचरा आता घरातच साठवला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. समतानगरमधील अनेक मोठ्या गृहसंकुलांमध्ये हा विषय गंभीर झाल्याने नागरिकांकडून ठाणे पालिका प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

ठाणेकर आंदोलनाच्या पवित्र्यात
नेमकी कचराकोंडी कशामुळे झाली आहे, कचरा न उचलण्याचे नेमके कारण काय, असा संभ्रम नागरिकांमध्ये पसरला आहे. घरात लहान मुले असल्याने मुलांच्याही आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेने हा कचरा तत्काळ नेला नाही तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

माजिवडा, मानपाडा, घोडबंदर आणि वागळे इस्टेट रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. इतर भागारील साचलेल्या कचऱ्याचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कचरा झाकला जात आहे. ३ ते ४ दिवसांत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासनाला यश येईल.
– मनीष जोशी (घनकचरा उपायुक्त ठाणे महापालिका