‘या’ दंगलीतून सरकार आपली राजकीय पोळी भाजतायत, अंबादास दानवे यांची टीका

औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटांत दंगा तुफान हाणामारी झाली. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात तणाव होता. या दंगलीत पोलिसही जखमी झाले आहेत. दरम्यान सध्या शहरात कर्फ्यू लावण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता आहे. या दंगलीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

”ज्या पद्धतीने नागपूरमध्ये दंगल पेटवण्याचा प्रयत्न झाला, या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपूरचे आहेत. दंगा होतो आणि पोलिसांना काहीही कळत नाही हे गंभीर आहे. गेल्या महिनाभरापासून राज्याचे वातवारण खराब करून, हिंदू मुसलमानांचे भांडण लावून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा पूर्ण प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. याने हिंदू मुसलमान दोघांचंही जनजीवन खराब करायचं व आपली राजकीय पोळी भाजायची. या दंगलीसाठी पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. या जबाबदारीतून त्यांना हटता येणार नाही. राजकारणाची पोळी भाजण्यासाठी भाजप व त्यांच्या अंगिकृत संघटना या राज्याचे वातावरण पूर्णपणे खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे हिंदूंनाही त्रास होणार आणि मुस्लिमांनाही त्रास होणार”, असे दानवे म्हणाले.