
बोगस मतदारांचा मुद्दा आज राज्यसभेत चांगलाच गाजला. बोगस मतदार याद्या तयार करून भाजपाने लोकसभा आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आज याप्रकरणी सरकारने तातडीने चर्चा करावी अशी मागणी केली. विरोधकांनी 267 अंतर्गत चर्चेची मागणी लावून धरली. परंतु, उपसभापती हरीवंश यांनी विरोधकांची मागणी मान्य करता येणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी भाजपा आणि मोदी सरकार नेमके काय लपवू पहात आहेत, त्यांना या मुद्दय़ावरून चर्चा का नको आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत सभात्याग केला. दरम्यान, हा देशातील लोकशाहीचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी तयार आहे का, असा सवाल डेरेक ओब्रायन यांनी केला.
वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात जंतर-मंतर येथे निदर्शने
वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे निदर्शने करण्यात आली. उद्या कुणीही उठून बोलू शकतो की ही मशिद नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांद्वारे चौकशी समिती नेमली जाऊ शकते. ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मशिद आमची संपत्ती नसणार, अशी या विधेयकात तरतूद आहे. त्यामुळे आमचा या विधेयकाला विरोधच असेल असे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले.