भाजप नेतेच फडणवीसांना औरंगजेब ठरवतायत, हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलेला नाही. औरंगजेब व फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली तर भाजपचे नेते फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली असा कांगावा करत देवेंद्र फडणवीस यांनाच औरंगजेब ठरवत आहेत, असा पलटवार कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज भाजप नेत्यांवर केला.

महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरू आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱयांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे. या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच कशी पोहचते ते बावनकुळेंनी सांगावे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर मराठी अस्मितेला ठेच पोहचत नाही का? कोरटकर, सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर बावनकुळे का बोलत नाहीत, असे सपकाळ म्हणाले.

महाराजांचे शौर्य पुसण्याचा प्रयत्न

औरंगजेब हा क्रूर शासक होता यात दुमत नाही, पण याच क्रूरकर्मा औरंजेबाला मराठी मातीत गाडले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व इतिहास आहे. हा इतिहास व महाराजांचे शौर्य पुसण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचे बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेबाबत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.