
धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी खोटय़ा कागदपत्रांद्वारे शेवाळे धरणाखाली आपली जमीन जात असल्याचे दाखवून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली. या जागेवर आपली डाळिंबाची शेती असल्याचा कांगावा करत आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी यंत्रणांना वेठीस धरून शासनाची 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. यासंदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात त्यांनी विविध कलमान्वये फिर्याद दाखल केली आहे.
विशेष म्हणजे रावल यांची अशी कोणतीही जमीन नाही. त्यासंदर्भात विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात यापूर्वीच ते स्पष्ट झाल्याचे गोटे यांनी नमूद केले. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रावल यांनी स्वतःच्या मालकीची एक इंचही जमीन नसल्याचे सांगितले. दोंडाईचा पोलीस ठाण्यात केलेल्या फिर्यादीतील आरोपींच्या यादीत जयकुमार जितेंद्र रावल, जितेंद्रसिंह जयसिंह रावल, जयदेवसिंह रावल, बिनानकुवर जयदेवसिंह रावल, नयनकुमार जितेंद्रसिंह रावल, तारामती चंद्रकांत भावसार, वैशाली चंद्रकांत भावसार, रवींद्र तानकू भवसार, राजेंद्र पंडित भावसार यांचा समावेश आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, शिंदखेडे या कायम दुष्काळी तालुक्यातील शेवाडे हा सुमारे सहा हजार हेक्टर शेतजमिनीचे बारमाही सिंचन करणारा मध्यम प्रकल्प (शेवाडे धरण) बांधण्याचे ठरवून, शासनाने 1993 मध्ये महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायद्यान्वये शेवाडी, वाडी, रेवाडी, देवी, सतारे व देगाव या सहा गावांची शेतजमीन ताब्यात घेण्यासाठी गॅझेटमध्ये नोटीस जाहीर केली. हरकती न आल्यामुळे शासनाने 13 मार्च 1996 रोजी गॅझेटमध्ये अंतिम नोटिफिकेशन जाहीर केले. पुनर्वसन या कायद्यामुळे सर्व सहा गावांतील शेतजमिनीचे व घरांचे खरेदी-विक्री व्यवहार गोठविले गेले होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस जमीन खरेदी, विक्रीवर बंदी घालण्यात आली होती, मात्र दोंडाईचा येथील वरील आरोपींनी पुनर्वसन कायद्याच्या नोटिफिकेशननंतरच शेवाडे धरणाच्या तथाकथित बुडीत क्षेत्रात शेतजमिनी विकत घेऊन, त्यावर तलाठी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, कृषी अधिकारी, भूमिअभिलेख निरीक्षक आणि पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या मदतीने बुडीत क्षेत्राच्या खोटय़ा नोंदी करून, फळझाडांच्या लागवडीचे व पीकपाण्याच्या नोंदींचे खोटे सातबारा उतारे तयार करून, संबंधित विशेष भूमिसंपादन अधिकारी यांच्या मदतीने शासनाला लाखो रुपयांना ठकविल्याचा थेट आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांच्यासोबत नरेंद्रभाऊ परदेशी, मनोज वाल्हे, म्हळसर गावाचे माजी सरपंच डॉ. सोमनाथ चौधरी, सचिन रुणवाल उपस्थित होते.
भ्रष्टाचारी रावल यांची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देणार
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. जयकुमार रावल यांनी रावल को.ऑप. बँकेत कोटय़वधी रुपयांचे घोटाळे करून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. रावल यांनी आपल्या कुटुंबातील खोटे कर्जदार तयार करून कोटय़वधी रुपये लाटल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हे प्रकरण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार असल्याचा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
रावल यांच्यासारखे एकच मंत्री मंत्रिमंडळात नाहीत, तर सात ते आठ मंत्री मंत्रिमंडळात असून त्यांनी महाराष्ट्राचे वातावरण खराब केल्याचा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे मुंडेंप्रमाणे यांचाही राजकीय बळी जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. हे बळी घेण्यासाठी भाजपचेच लोक आम्हाला ‘हत्यारे’ पुरवत असल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे. फडणवीस सरकारधील सात ते आठ मंत्र्यांनी महाराष्ट्राचे वातावरण खराब केल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. दरम्यान, जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोटय़ा कागदपत्रांच्या सहाय्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातील जमीन लाटल्याचा आरोप केला आहे.
सहा महिन्यांत आणखी एक बळी – सुप्रिया सुळे
भ्रष्ट कारभारामुळे शंभर दिवसांत एका मंत्र्याचा बळी गेला. अजून सहा महिने थांबा. आणखी एका मंत्र्याचा बळी जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, धुळे जिल्हा न्यायालयाने ताशेरे ओढले असून रावल यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन परत करण्याचे आदेश दिल्याचेही समजते.
प्रकरण शिंदखेडा पोलीस ठाण्याकडे
पोलिसांनी शेवाडे धरण क्षेत्रातील शेवाडी, वाडी, रेवाडी, देवी, सतारे, देगाव ही गावे आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने सदर फिर्याद आम्ही शिंदखेडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करणार असल्याचे सांगितले. तसेच तक्रारीसोबत पुराव्यांदाखल जोडलेल्या 107 कागदपत्रांची पोहोच दोंडाईचा पोलीस ठाण्याने माजी आमदार अनिल गोटे यांना दिली आहे.