दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाला ड्यु प्लेसिसचा आधार

गेल्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाचा वाद सुटत नव्हता. तेव्हा अक्षर पटेलकडे नेतृत्व सोपवत दिल्ली संघ व्यवस्थापनाने तिढा सोडवला. आता त्या नेतृत्वाला उपकर्णधार म्हणून फॅफ ड्यु प्लेसिसचाही आधार देण्यात आला आहे. या दक्षिण आफ्रिकन फलंदाजाने आतापर्यंत जगभरातील लीग फ्रेंचायझीजसाठी 404 टी-20 सामने खेळले आहेत आणि त्याने 383 डावांत 78 अर्धशतकांच्या सहाय्याने 11,236 धावा केल्या आहेत. त्याचा आयपीएलचा अनुभवही दांडगा असल्यामुळे संघाला त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही संघ व्यवस्थापनाला आहे.

डय़ु प्लेसिस हा चेन्नई सुपर किंग्जचाही खेळाडू होता आणि त्याच्या उपस्थितीत दोनदा संघ जिंकलाही आहे. गेल्या वर्षी या दिग्गज खेळाडूला लिलावात दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या दोन कोटी रुपयांच्या किमतीत आपल्याकडे खेचले होते.