
मोदी काळात सरकारवर टीका करणे हा राजद्रोह ठरत आहे व तसे कायदे आता ‘बाजारा’त आणले जात आहेत. टीका करणाऱ्यांना ‘ईडी’, ‘सीबीआय’ची दहशत दाखवून जेरीस आणले गेले. तरीही पंतप्रधान मोदी लेक्स फ्रिडमॅनला सांगतात, ‘‘टीका हा लोकशाहीचा आत्मा असल्यामुळे आपल्यावर होणाऱ्या टीकेचे आपण स्वागत करतो.’’ तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये फ्रिडमॅन व मोदी यांनी ही अशी बहार उडवली आहे. फ्रिडमॅनच्या जागी रवीशकुमार वगैरे असते तर मुलाखतीत फटाके फुटले असते. लोकांना एक रोमांचक सामना पाहता आला असता. मोदी ही संधी लोकांना का देत नाहीत?
देशातील महागाई, बेरोजगारी, गरिबी, स्वतः दिलेली फसवी आश्वासने हे सर्व ज्वलंत मुद्दे टाळून पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकी पॉडकास्टवरून पाकिस्तानला दूषणे दिली आहेत. गोदी मीडियाने त्याचा उल्लेख ‘मोदींचा पाकिस्तानवर घणाघात’ असा केला आहे. मोदी यांनी मुलाखत देण्यासाठी अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन याची निवड केली. मोदी यांनी परदेशी पत्रकाराला मुलाखत देण्यापेक्षा भारतातील रवीशकुमार, दीपक शर्मा, संजय राऊत, संजय शर्मा, साक्षी जोशी यांसारख्या पत्रकारांना मुलाखतीसाठी वेळ दिला असता तर मुलाखत अधिक रंजक व विश्वासपात्र झाली असती. या सगळ्यांना मुलाखत घेण्याची संधी मिळाली असती तर मोदींना रेटून खोटे बोलणे व पतंगबाजी करणे अवघड गेले असते आणि या देशी पत्रकारांनी मोदींचा खोटेपणा पकडून प्रश्नांची सरबत्ती केली असती. त्यामुळे मोदी व त्यांच्या मीडिया सल्लागारांनी लेक्स फ्रिडमॅनची नियुक्ती केली. मोदींची मुलाखत घेण्यापूर्वी हा फ्रिडमॅन कोण ते तसे कुणालाच माहीत नव्हते. त्या फ्रिडमॅनशी मोदी बोलले व त्यांनी पाकिस्तानवर हल्ला केला. मोदींची ही मुलाखत भविष्याचा वेध घेणारी नाही. ते वर्तमानात तर वावरताना दिसत नाहीतच, उलट शंभर वर्षे मागे जाऊन भूतकाळातील भुते नाचवताना दिसले. मोदी म्हणतात, पाकिस्तानकडून फक्त विश्वासघातच झाला. पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही हर प्रकारे प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानकडून नेहमी शत्रुत्व आणि विश्वासघातच वाट्याला आला. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी पाकिस्तानचा प्रश्न राजकीय लाभाचा आहे म्हणून ते पाकिस्तानवर भरभरून बोलले. मोदी राजकारणात नव्हते तेव्हा भारत आणि पाकिस्तानात दोन थेट युद्धे झाली व या दोन्ही युद्धांत भारताने पाकिस्तानला धूळ चारली. 1971 च्या युद्धात बांगलादेश निर्माण करून इंदिरा गांधी यांनी 1947 सालच्या फाळणीचा सूड घेतला. हे शौर्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले व त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी करायला हवा होता. मोदी यांच्या काळात ‘पुलवामा’ घडले. दहशतवाद्यांनी पन्नासेक भारतीय सैनिकांची हत्या केली व त्या बदल्यात एक
‘सर्जिकल स्ट्राईक’ नावाचा खेळ
मोदी सरकारने केला. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनला असला तरी तो आता एक कमजोर देश झाला आहे. त्यामुळे मोदींना पाकिस्तानवर नेहमीच बोलायला सोपे जाते. मात्र आपल्या बाजूचाच चीन आपल्या अरुणाचल, लडाख हद्दीत घुसला आहे व त्याने भारतीय जमिनीवर ताबा मिळवला आहे. चीनकडूनदेखील आपला विश्वासघातच झाला आहे आणि हे एक प्रकारचे आक्रमणच आहे. मग चीनच्या या आगळिकीलाही भारत सडेतोड उत्तर देईल, असे मोदी यांनी मुलाखतकार फ्रिडमॅनला का सांगितले नाही? मोदी यांनी सांगितले नाही व फ्रिडमॅनने उपप्रश्न विचारला नाही. फ्रिडमॅनच्या जागी तटस्थ पत्रकार असता तर त्याने चीनच्या घुसखोरीवर मोदींना नक्कीच बोलायला लावले असते. ताज्या अमेरिका भेटीत तुमचे मित्र ट्रम्प यांनी तुमचा अपमान का केला? तुमच्यासारख्या मित्राला आपल्या शपथविधी सोहळ्यास का आमंत्रित केले नाही? बांगलादेशात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी तुमच्यावर टाकली, त्यात किती यश आले? अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीयांना हातापायांना बेड्या घालून ‘गुलाम’ किंवा ‘अतिरेक्यां’प्रमाणे लष्करी विमानाने भारतात पाठवले. मात्र नेपाळ, ब्राझीलसारख्या राष्ट्रांना ही वागणूक दिली नाही, यावर तुम्हाला खंत वाटते काय? भारतात वाढत असलेली धर्मांधता तुम्ही कुठपर्यंत जाऊ देणार? तुमच्या राजकीय यशाचा हाच मार्ग आहे काय? भारतात लोकशाही धोक्यात आहे व ईव्हीएम, निवडणूक आयोग हाच घोटाळा आहे. स्वतः प्रे. ट्रम्प यांनी त्यावर भाष्य केले. या घोटाळ्यात तुमचा पक्ष सहभागी आहे काय? तुमच्या कारकीर्दीत वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होतात. मागच्या दहा वर्षांत 20 कोटी बेरोजगारांना काम देण्याचे ध्येय पूर्ण झाले काय? अदानी हे तुमचे मित्र नक्कीच आहेत, पण त्या एका व्यक्तीसाठी संपूर्ण देशाला गुलाम बनवायचे उद्योग कधी थांबणार? अदानी यांच्या विरोधात अमेरिकेने पकड वॉरंट काढले आहे. त्या विरोधात तुम्ही हस्तक्षेप करणार आहात का? नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेतील अदानी यांच्या विरोधातील खटल्यासंदर्भात आपण सौदेबाजी केल्याचा आरोप होत आहे, त्याबाबत आपले काय म्हणणे आहे? एलन
मस्क यांच्या ‘स्टारलिंक’
कंपनीची सॅटेलाइट ब्रॉडबॅण्ड सेवा भारतातही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र ‘स्टारलिंक’चा भारतातील प्रवेश अनेक दृष्टीने चिंता वाढविणारा ठरू शकतो. डेटा सुरक्षिततेसह भारत एखाद्या आणीबाणीच्या संकटात सापडल्यावर ‘स्टारलिंक’ कितपत तटस्थ राहील, स्टारलिंकमुळे देशांतर्गत सुरक्षेला उद्भवणारा धोका असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांची काय उत्तरे तुमच्याकडे आहेत? असे अनेक प्रश्न फ्रिडमॅनच्या पॉडकास्ट कार्यक्रमात विचारले जायला हवे होते, परंतु ते विचारण्यात आले नाहीत. अर्थात अडचणीत आणणारे कोणतेच प्रश्न विचारू नयेत या शर्तीवरच फ्रिडमॅन याला पंतप्रधानांची मुलाखत घेऊ दिली. मोदी यांनी बहुधा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना हवी असलेली प्रश्नावली फ्रिडमॅनला पाठवली व त्यानुसार पॉडकास्टचा कार्यक्रम पार पडला. लोकांच्या मनात ज्या शंका आणि प्रश्न आहेत, त्यावर प्रश्न नाहीत व उत्तरे नाहीत. मोदी यांनी संघाविषयी एक विधान केले. संघामुळे आपल्याला जगण्याचे प्रयोजन गवसले. संघाने आपल्यावर सर्व प्रकारे संस्कार केले. देशभक्तीची आणि जीवनविषयक मूल्ये रुजवली. पंतप्रधानांचे संघाविषयीचे मत त्यांनी आडपडदा न ठेवता मांडले, पण सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपमध्ये निर्माण झालेल्या देव आणि अवतारांवर टीका केली, ती आपणास मान्य आहे काय? हिंदू-मुसलमानांचा डीएनए एक असल्याचे सरसंघचालकांचे भाष्य मान्य आहे काय? यावर फ्रिडमॅन साहेबांनी मोदींना बोलते केले नाही. मोदी काळात सरकारवर टीका करणे हा राजद्रोह ठरत आहे व तसे कायदे आता ‘बाजारा’त आणले जात आहेत. टीका करणाऱ्यांना ‘ईडी’, ‘सीबीआय’ची दहशत दाखवून जेरीस आणले गेले व विरोधकांचे अनेक आमदार, खासदार पाडण्यात आले. विरोधी पक्ष फोडले गेले. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना मोदी काळात कोणतेच महत्त्व उरले नाही. तरीही पंतप्रधान मोदी लेक्स फ्रिडमॅनला सांगतात, ‘‘टीका हा लोकशाहीचा आत्मा असल्यामुळे आपल्यावर होणाऱ्या टीकेचे आपण स्वागत करतो.’’ तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये फ्रिडमॅन व मोदी यांनी ही अशी बहार उडवली आहे. फ्रिडमॅनच्या जागी रवीशकुमार वगैरे असते तर मुलाखतीत फटाके फुटले असते. लोकांना एक रोमांचक सामना पाहता आला असता. मोदी ही संधी लोकांना का देत नाहीत?