15 हजार क्विंटल भात विकूनही फुटकी कवडी नाही, मुरबाडच्या 4 हजार शेतकऱ्यांचे पैसे आदिवासी विकास महामंडळाने लटकवले

भात उत्पादक शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला 15 हजार क्विंटल धान्य विकले. या व्यवहाराला अडीच महिने उलटले तरी अद्यापही शेतकऱ्यांना फुटकी कवडी मिळालेली नाही. महामंडळाने मुरबाडमधील तब्बल 4 हजार 342 शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लटकवले आहेत. 31 मार्चपूर्वी हे हक्काचे पैसे मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुरबाड तालुका हा धान्याचे कोठार म्हणून समजला जातो. या शेतकऱ्यांनी पिकवलेला भात पाटगाव, माळ, धसई या केंद्रांवर आदिवासी विकास महामंडळाला विकण्यात आला. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांनी घामाने पिकवलेला भात दिला. त्याचा दर प्रति क्विंटल 2 हजार 300 रुपये एवढा आहे. हे पैसे तातडीने मिळणे गरजेचे असताना अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही दिलेला नाही.

तर व्याज भरावे लागेल

एकात्मिक हमीभाव योजनेंतर्गत मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात खरेदी करण्यात आला. पण त्याचे पैसे 31 मार्चपूर्वी मिळाले नाहीत तर शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेल्या कर्जावर व्याज भरावे लागणार आहे. लवकरात लवकर हे पैसे द्यावेत अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे ग्रामीण संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी दिला आहे.