पेणमध्ये आणखी एक ‘शीना बोरा’; हातावरील टॅटू, गाऊन, चाप आणि सुटकेसही उलगडणार हत्येचे गूढ

तिचा मृतदेह कोंबून नदीकिनारी फेकून दिलेल्या सुटकेसमुळे दूरशेत ग्रामस्थांची झोप उडाली आहे, तर पोलीसही चक्रावून गेले आहेत. मृतदेह पूर्णपणे कुजून गेलेल्या त्या तरुणीची ओळख पटवण्यासाठी रायगड पोलीस आता रात्रीचा दिवस करत आहेत. पोलिसांच्या आधारासाठी आहे मृतदेह सापडलेली सुटकेस, त्या तरुणीच्या हातावर गोंदवलेला इंग्रजी अक्षरातील ‘A’, तिचा गाऊन आणि तिच्या डोक्याला लावलेला चाप. 2012 मध्ये खालापूर हद्दीत मृतदेह फेकून दिलेल्या शीना बोरा हत्याकांडाची आठवण या घटनेमुळे पुन्हा ताजी झाली आहे.

पेणपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दूरशेत गावाच्या नदीकिनारी 8 मार्च रोजी एक सुटकेस सापडली. त्यात एका 25 वर्षीय तरुणीचा पूर्णपणे कुजून गेलेला मृतदेह सापडला आणि ती युवती कोण? तिची हत्या कुणी आणि का केली याची चर्चा सुरू झाली. तिची उंची 148 सेंटीमीटर म्हणजे 4 फूट 10 इंच असून रंग गोरा आहे. या युवतीने गाऊन परिधान केला होता. तिच्या हातात लाल रंगाची बांगडी व बोटात एक अंगठी आढळून आली आहे. तसेच केसांना लावलेला चापही मिळाला आहे. सदर तरुणीने उजव्या पायाच्या अंगठ्यावर लाल रंगाची नेलपेंट लावली होती. या तरुणीच्या उजव्या हाताच्या मनगटावर A अक्षर गोंदविण्यात आले होते. A पासून तिच्या नावाची सुरुवात होत होती की तिने प्रियकराच्या नावाचे पहिले अक्षर गोंदवून घेतले होते याचे गूढ कायम आहे. दुसरा कोणताही पुरावा मारेकऱ्यांनी मागे ठेवलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी A अक्षर, गाऊन, सुटकेस आणि तिच्या केसातील चाप यांना समोर ठेवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

■ दूरशेत गावात तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. ही तरुणी कोण, तिची हत्या का करण्यात आली, तिचा मृतदेह याच ठिकाणी का टाकण्यात आला, याबाबत ग्रामस्थांमध्ये अनेक तर्कविर्तकांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.