
उद्घाटन येत्या जून महिन्यात होणार असल्याची घोषणा अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी आज नवी मुंबईत केली. अदानी यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या साईटला भेट देऊन पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण असलेल्या कामांचा आढावा घेतला. यापूर्वी राज्य सरकारने विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी 31 मार्च आणि 17 एप्रिल या डेडलाईन जाहीर करून मे महिन्यात प्रवासी सेवा सुरू होणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र गौतम अदानी यांनी आज केलेल्या घोषणेमुळे या दोन्ही डेडलाईन हुकल्या, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वच चाचण्यांमध्ये पास झाल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये व्यावसायिक प्रवासी विमान धावपट्टीवर उतरवण्यात आले. ही चाचणीही यशस्वी झाल्यानंतर येत्या 17 एप्रिलला विमानतळाचे उद्घाटन होणार असे जाहीर करण्यात आले होते. उद्घाटन जरी एप्रिलमध्ये झाले तरी देशांतर्गत विमानसेवा 15 मेच्या आसपास सुरू होणार असल्याचेही यावेळी सिडको आणि अदानी समूहाने स्पष्ट केले होते. मात्र आज अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या साईटला भेट दिली. त्यांनी धावपट्टी, टॅक्सी रन वे, टर्मिनल बिल्डिंग यांची पाहणी केली आणि संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विमानतळाचे उद्घाटन येत्या जून महिन्यात होईल असे जाहीर केले. याप्रसंगी डॉ. प्रीती अदानी, जित अदानी, दिव्या अदानी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीचे सीईओ अरुण बन्सल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय लिमिटेड कंपनीचे सीईओ बीव्हीजेके शर्मा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आता एअर इंडियाचे विमान उतरणार
नवी मुंबई विमानतळावर 11 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वप्रथम इंडियन एअरफोर्सचे सी-295 हे विमान उतरले होते. त्यानंतर 29 डिसेंबर 2024 रोजी इंडिगो एअर लाईन्सच्या ए-320 या प्रवासी विमानाने धावपट्टीची चाचणी घेतली होती. त्यापाठोपाठ आता टाटा समूहाच्या एअर इंडिया या कंपनीचे विमानही धावपट्टीची चाचणी घेणार आहे. एअर इंडियाच्या विमानाचे लॅण्डिग येत्या एप्रिल महिन्यात होणार आहे, असे एनएमआयएएलच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.