
आपल्याकडे दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. दूधातील पोषक घटक आपल्याला दिवसभर चांगलीच उर्जा देतात. म्हणूनच सकाळी दूध पिणे हे कायम फायदेशीर मानले जाते. दूध हे कितीही फायदेशीर असले तरी, कोणाचे दूध अधिक उत्तम हा एक परवलीचा प्रश्न आहे.
सध्या सोया मिल्कचे फॅडही खूप आलेले आहे. असे असले तरी दुधातील कार्ब, प्रथिने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सर्व सस्तन प्राणी दूध देतात यामध्ये गाय आणि म्हशीशिवाय शेळी, उंट आणि मेंढीचे दूध मिळते. परंतु आपल्याकडे बहुतांश लोक केवळ गाय आणि म्हैस यांचेच दूध पितात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर आपल्याकडे गायीचे दूध हे कमी फॅटस् असते म्हणून अनेकजण पितात. तर म्हशीच्या दूधात फॅटस् जास्त असतात. गाय किंवा म्हैस या दोहोंचेही दूध आपल्यासाठी फायदेशीर आहे. परंतु म्हशीच्या दुधावर बहुतांशी लोक जास्त भर देतात. या दूधामध्ये गाईच्या दुधापेक्षा जास्त साय निघते. तसेच गायीच्या दूधापेक्षा म्हशीचे दूध हे खूप महाग आहे.
गाईचे दूध हे आईचे दूध असे मानले जाते म्हणून तान्ह्या मुलांना म्हशीपेक्षा गायीचे दूध दिले जाते. गाईचे दूध हे मुख्यतः पचण्यास खूपच हलके असते. तसेच गायीच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाणही खूपच कमी आहे. म्हशीचे दुध म्हणजे अस्सल मलईयुक्त दुध.
म्हशीच्या दुधाला गायीच्या दुधापेक्षा सायही जाडसर धरते. त्यामुळेच म्हशीच्या दुधाचा वापर प्रामुख्याने चीज, खीर, कुल्फी, दही, तूप असे पदार्थ करण्यासाठी केला जातो. गाईच्या दुधापासून रसगुल्ला, रसमलाई इत्यादी पदार्थ बनवले जातात. तर मुख्य गोष्ट म्हणजे गायीचे दूध हे जास्तीत जास्त 2 दिवसात सेवन करावे. म्हशीचे दूध आपण जास्त दिवस ठेवून सेवन करू शकतो.
दुधामधील घटकांच्या आधारे आपण तुलना केली तर म्हशीच्या दुधात प्रथिने जास्त असतात. त्यामुळेच म्हशीच्या दुधातही कॅलरी जास्त असतात. मुख्य म्हणजे गाय असो किंवा म्हैस या दोन्ही दुधांमुळे आपली हाडे मजबूत राहतात. गाईच्या दुधामध्ये म्हशीच्या दुधापेक्षा चरबीचे प्रमाण कमी असते. म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा 10 ते 11 टक्के प्रथिनांची मात्रा अधिक असते. म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असल्यामुळे, पीसीओडी, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठ लोकांसाठी चांगले मानले गेले आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)