
राधानगरी व करवीर तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या व 3.47 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धामोड येथील तुळशी धरणातील गाळ यंत्राच्या साहाय्याने काढून तुळशी धरणाची घटलेली पाण्याची क्षमता वाढवावी, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी आणि नागरिकांतून अनेक वर्षांपासून होत आहे.
सध्या धरणात दोन टीएमसीपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे. दोन वर्षांपूर्वी पात्र कोरडे पडल्याने लाभक्षेत्रातील कानकेकरवाडी, खामकरवाडी, पिंपरीचीवाडी, तळगाव, भुजंग पाटीलवाडी, मोहितेवाडी, देऊळवाडी, जोतिबा वसाहत या गावांना शेती, जनावरे व पिण्यासाठी पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाटबंधारे खात्याच्या योग्य नियोजनामुळे गतवर्षी आणि यंदा मात्र तशी परिस्थिती नाही.
47 वर्षे पूर्ण झालेल्या तुळशी धरणात एक टीएमसी एवढा गाळ जमा झाल्याचा कयास आहे. त्याचा परिणाम धरणाच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. पाटबंधारे व प्रशासनाने धरणातील गाळ यांत्रिकी मशिनरीच्या साहाय्याने काढून घेतल्यास धरणाच्या जलाशयाच्या साठ्यात तर वाढ होईल. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत दिल्यास शेतीची कार्यक्षमता वाढेल. जलसंपदा विभागाने समर्थता दर्शविली तर लोकसहभागसुद्धा वाढेल. याचे नियोजन आत्ताच करून आगामी काळात तुळशी धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
या धरणाचे कार्यक्षेत्र हे नैसर्गिक असून, ते पूर्णपणे मातीच्या डोंगरदयातील आहे. पाणलोटक्षेत्र पाच किलोमीटर विस्तारलेले आहे. पावसाळ्यात या धरणात पाणी जमा होताना पाण्याबरोबर माती वाहून येत असल्याने त्याचा परिणाम धरणाच्या पाणी साठवणुकीवर होतो. राज्यातील धरणातील गाळ काढण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील संबंधित विकास महामंडळाच्या मार्फत करावी, असा शासननिर्णय आहे. त्यानुसार तुळशी जलाशयातील हा गाळ काढला तर एक ते दीड टीएमसी पाणी साठवण क्षमता वाढून धरणातील पाणीसाठा 4.50 टीएमसीवर पोहोचेल. पाण्याद्वारे शेतीचे एक आवर्तन देण्यास त्याचा निश्चित फायदा लाभक्षेत्रातील नागरिकांना व कोल्हापूर शहराला होईल.
राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी, धामणी या प्रमुख धरणांतून पाणी कोल्हापूरला पोहचते. शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. धरणांतील गाळ काढल्यानंतर पाणीसाठा वाढून पर्याप्त पाणी शहरवासीयांना मिळेल. टंचाईसदृशकाळात याचा निश्चित फायदा होईल.
फेब्रुवारी 2023 मध्ये दिल्लीवरून केंद्रीय जल आयोग समितीच्या अधिकाऱ्यांनी गाळ निरीक्षण करण्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी तुळशी धरणास भेट देऊन सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल अद्यापि जलसंपदा विभागाला प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त होताच, पुढील कार्यवाही केली। जाईल, असे आश्वासन पाटबंधारे खात्याकडून यापूर्वीच दिले आहे.
धरणातून अकृषक वापरासाठी (पिण्याचे पाणी योजना) व शेतीसाठी पाणी सोडले जाते. या वापरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, शेतीसाठी टंचाईच्या काळात पाणीवापरावर बंधने येऊ शकतात. मार्च ते जून अती उष्ण उन्हाळा व बाष्पीभवनामुळे जवळपास पाच टक्के पाणी कमी होऊन धरणाचा मृतसाठा वगळून शेतीसाठी कमी पाणी शिल्लक राहते. तरी प्रशासनाने याचे लवकर नियोजन करून आगामी काळात निघणारा गाळ हा शेतकऱ्यास मोफत उपलब्ध करून दिल्यास या भागातील जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होईलच; शिवाय पाणीसाठाही वाढेल.
– एल. एस. पाटील, प्रगतशील शेतकरी, धामोड, ता. राधानगरी