औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफरला चपलाहार, पतित पावन संघटनेच्या आंदोलनाची चर्चा

पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन केले. मात्र आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. यामुळे आता आंदोलनाची चर्चा शहरभर रंगली आहे.

लाल महाल चौकात पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबविरोधात घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदोउदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होते, मात्र आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहाद्दूर शाह जफर याचा फोटो जाळला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून अनेकजण यावर टीका करत आहेत. काहींनी आंदोलनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बहाद्दूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिशांविरोधात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ब्रिटिशांनी त्यांना कैद करून रंगून येथे पाठवले, जिथे त्यांनी आपले उर्वरित आयुष्य जगले आणि निधन पावले. त्यांचा औरंगजेबाशी कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे त्यांचा फोटो जाळल्याने आंदोलनकांची चूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.