
कर्करोग उपचार संशोधनाच्या नावाखाली व्यावसायिकाची 9 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अंबोली पोलिसांनी अटक केली. आर्जूबानो सय्यद आणि सैफउद्दिन सय्यद अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार या अंधेरी येथे राहतात. दोन वर्षांपूर्वी त्याची एकाशी ओळख झाली होती. ओळखीनंतर तिने ती डॉक्टर असून कर्करोगाच्या उपचारावर संशोधन करत असल्याचे सांगितले.
नवी मुंबई येथील एका खासगी महाविद्यालयात संशोधन सुरू असल्याचे भासवले. जर गुंतवणूक केल्यास चार ते पाच टक्के परतावा देऊ असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून त्याने गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केल्यावर त्याने परताव्याची रक्कम देणे बंद केली होती. वारंवार विचारणा करूनदेखील ते टाळाटाळ करत होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.