…तर विराट कोहली ऑलिम्पिकमध्ये खेळणार, एका अटीवर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमनास कोहली तयार

टी-20 क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या छोटय़ा फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघ फायनलमध्ये गेला तर ऑलिम्पिक फायनलसाठी मला टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करायला आवडेल, असे विधान विराट कोहलीने केले आहे.

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 18 व्या पर्वासाठी विराट कोहली 15 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात दाखल झाला. आरसीबीच्या फ्रेंचाईजींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विराट कोहलीने या पुनरागमनाबद्दल भाष्य केले. ऑलिम्पकमधील क्रिकेटच्या समावेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ‘मी ऑलिम्पिक खेळण्यासाठी टी-20 क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेणार नाही, मात्र टीम इंडिया फायनलला पोहोचली तर सुवर्णपदकाच्या लढतीत खेळण्यासाठी नक्कीच मला टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करायला आवडेल. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतणे नक्कीच भूषणावह असेल,’ असेही त्याने म्हटले आहे, मात्र विराट कोहलीने निवृत्तीबद्दलचे हे भाष्य गमतीने केलेले आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये टीम इंडिया जरी फायनलमध्ये पोहोचली तर केवळ सुवर्णपदकाच्या लढतीसाठी विराटला अंतिम अकरामध्ये खेळविण्याची घोडचूक ‘बीसीसीआय’ची संघनिवड समिती कदापि करणार नाही एवढे नक्की.