कुटुंब हवंय सोबतीला, दौऱ्यावर कुटुंबासह राहण्यासाठी विराटचा पाठिंबा

ऑस्ट्रेलिया दौऱयानंतर बीसीसीआयने क्रिकेटपटूंना दौऱ्यावर कुटुंबाला सोबत ठेवण्यासाठी मर्यादित दिवसांची नियमावली तयार केली होती. मात्र ही नियमावली हिंदुस्थाच्या विराट कोहलीला काहीशी खटकली असून दौऱ्यावर कुटुंब सोबतीला हवंच, अशी विराट भावना खुद्द कोहलीनेच व्यक्त केलीय. आता त्याच्या या मतानंतर बीसीसीआयच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱयातील दारुण पराभवानंतर बीसीसीआयने 45 दिवसांपेक्षा अधिक मोठय़ा दौऱयांवर खेळाडूंना आपल्या कुटुंबीयांना केवळ 14 दिवसच सोबत ठेवता येईल, असे निर्देश जारी करण्यात आले होते. तसेच त्यापेक्षा छोटय़ा दौऱ्यावर एका आठवडय़ासाठी खेळाडूंना बायको, मुले किंवा मैत्रिणीसोबत राहता येईल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत फायदा की नुकसान?

चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान कोहली, जाडेजा आणि मोहम्मद शमीचे कुटुंबीय दुबईत आले होते, पण ते कुटुंबीयांसोबत नव्हते. त्यांना शेजारील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. विशेष म्हणजे याचा सर्व खर्च खेळाडूंनी केला. बीसीसीआयने याची जबाबदारी घेतली नव्हती, पण खेळाडूंवर लादलेल्या निर्बंधांमुळे टीम इंडिया चॅम्पियन्स झाली असेही समोर आलेय. जरी विराटसारख्या मोठय़ा खेळाडूला कुटुंबाला दूर ठेवणे खटकले असले तरी याचा फायदा झाला आहे की नुकसान याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असाही सूर क्रिकेटविश्वातून निघाला आहे.

कुटुंब सोबत असलं की धीर मिळतो

आपल्या हॉटेलच्या रूममध्ये एकटा उदास बसण्यापेक्षा कठीण आणि तणावाच्या वेळी कुटुंब सोबत असलं की धीर मिळतो. लोकांना याचे महत्त्व कळू शकत नाही. कुटुंबासोबत जबाबदारी वाढते. आम्ही अधिक जबाबदारीने खेळतो. मैदानातली आव्हाने आणि जबाबदारी पूर्ण करून आपण जेव्हा घरी परततो तेव्हा आपल्या घरचं वातावरण अत्यंत सामान्य असतं. हेच वातावरण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मला जेव्हा शक्य असते तेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत माझा वेळ घालवतो. तोच माझ्यासाठी आनंदाचा दिवस असतो. ज्यांचा या मुद्दय़ांशी काडीचाही संबंध नव्हता त्यांनी यात ढवळाढवळ केलीय. पण याच मुद्दय़ाबाबत तुम्ही खेळाडूंना विचारलात तर त्यांचे एकच म्हणणे असेल, आमचे कुटुंब आमच्यासोबत असायला हवे.