
पोलादपुरात शिमग्याच्या सणाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास मंदिरातील दिवे बंद करण्यासाठी जात असताना खासगी लक्झरी बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बसचालकाला अटक केली आहे. राहुल श्रीरंग साळुंखे आणि सिद्धेश गणेश सकपाळ अशी मयत तरुणांची नावे आहेत.
कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावात उशिरापर्यंत शिमग्याचा कार्यक्रम सुरु होता. यामुळे पहाटेपर्यंत मंदिरातील दिवे सुरु होते. हे दिवे बंद करण्यासाठी राहुल आणि सिद्धेश सकाळी साडे सहाच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते.
यादरम्यान ओंबळीमार्गे खेडला जाणाऱ्या बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात राहुल आणि सिद्धेश दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात बसचालक प्रेमचंद महात्ता चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.