लोकांच्या पोटात अन्न नाही आणि हे हिंदुत्ववाद करत बसलेयत, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी झटका मटणवरून भाजपवर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. ”लोकांच्या पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करत बसलेयत”, अशा शब्दात त्यांनी भाजप व संघाला सुनावले आहे.

”कालपर्यंत संघाला शिव्या घालत होते, वीर सावकरांना शिव्या घालत होते, संघाला हाफ चड्डीवाले बोलत होते, फडणवीस, मोदींना शिव्या घालत होते ते आता आम्हाला हिंदुत्व शिकवतायत. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. पण आम्ही बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या हे विषय घेऊन राजकारणात आहोत. आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतोय. लोकांच्या पोटात अन्न नाही आणि तुम्ही हिंदुत्ववाद करत बसलायत. काही लोकं छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत, राखरांगाोळी करायला निघाले आहेत. हे राज्य नष्ट व्हावे अशी सुपारी देऊन यांना भाजपमध्ये पाठवलंय का? देवेंद्र फडणवीस जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर हे सहन कसं करायतायत? मोहन भागवातांना जर देशाची खरोखर चिंता असेल तर हे सहन कसं करतायत. हलाल आणि झटक्यांमुळे हिंदुत्वाला झटका बसणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद घेत औरंगझेबाच्या कबरीबाबत बोलताना बाबरीची पुनरावृत्ती घडेल, असा इशारा दिला. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, यांनी कुठे केली बाबरीची पाडली. हे पळून गेले. हे कुठे होते. आम्ही होतो. आमच्यावर अजून खटले सुरू आहेत. हे जे म्हणतायत आम्ही हे करू ते करू. हे आता चारशे वर्षापूर्वीची कबर खोदायला निघाले आहेत, औरंगझेबाच्या कबरीवर बोलताय, इथे तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता जळाल्या आहेत त्यावर बोला, त्यावर कुणाला संवेदना नाहीत का. तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगझेबाने कबरीतून उठून आत्महत्या करायला लावली का? बेरोजगार मुलांच्या डोक्यात फालतू धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जातंय. कश्मीर मधला तरुण दंगलखोर झाला कारण त्यांच्या हातात काम नव्हतं. आज महाराष्ट्रातही मला कश्मीर सारखीच परिस्थिती दिसतेय. हे कटू सत्य आहे. बेरोजगारी महागाई, शेतकर्याच्या आत्महत्या वरून लक्ष हटविण्यासाठी पावला पावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातोय. उदय सामंत यांचं अभिनंदन करतोय. त्यांनी संयमाने भूमिका घेऊन दोन समाजात तेढ निर्माण झालेला तो संपवायचा प्रय्त्न केला. कोकणता कधी अशा दंगली घडल्या नव्हत्या. कालचे पाद्रे पावटे हिंदुत्वाच्या नावावर कोकणात दंगली घडवतायत, कोकणाची राखरांगोळी करायची आहे का? चारशे वर्षापूर्वीची कबर खणायला निघालेयत पण यांना तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत. महाराष्ट्राची कबर, थडगं होताना दिसतेय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.