
वसईतील शिरवली गावात पिशवीत गुंडाळलेल्या शिराचे गूढ उकलण्यात मांडवी पोलिसांना यश आले आहे. कोणताही पुरावा नसताना फक्त ज्वेलर्सच्या पाऊचवरून मृत महिलेची ओळख पटवली. उत्पला हिप्परगी असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. या वादातूनच पतीने उत्पला हिची हत्या केली. नंतर धडावेगळे केलेले तिचे शिर पिशवीत गुंडाळून झुडपात फेकले याप्रकरणी गुन्हे शाखेने नराधम पती हरीश हिप्परगी याला अटक केली.
तरुणांचा ग्रुप शिरवली गावात जात होता. यातील काही तरुण पीर दर्याजवळ आडोशाला लघुशंकेसाठी गेले असता त्या तरुणांना एका पिशवीत गुंडाळलेले महिलेचे शिर सापडले. त्यांनी तत्काळ याची माहिती मांडवी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पोलिसांना ज्वेलर्सचे पाऊच सापडले. त्या दिशेने पोलीस पथकाने तपास सुरू केला. तपासात महिलेचे नाव उत्पला हिप्परगी असून ती मुंबईत राहत असल्याचे समोर आले.
असा काढला काटा
पोलिसांनी नालासोपाऱ्यातून हरीशला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. गेल्या काही महिन्यांपासून उत्पला आणि हरीश यांच्यामध्ये वाद सुरू होते. ८ जानेवारी रोजी त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की हरीशने गळा आवळून पत्नीची हत्या केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पतीने शिर शरीरापासून वेगळे केले. ते शिर एका बॅगेत भरून ते शिरवली गावातील झाडाझुडपात फेकून दिले. उर्वरित धड गोणीत भरून नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर येथील नाल्यात फेकले.