
सण-उत्सव, लग्नसराईचा कालावधी तोंडावर असतानाच सोन्याला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. मोदी सरकारच्या काळात दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असून गेल्या काही तासांत सोन्याचे दर हजार रुपयांनी वधारले आहेत. प्रतितोळा सोने 91 हजारांवर पोहोचले असून डोनाल्ड ट्रम्प सरकारने टॅरिफ दर वाढवल्याने येत्या काळात सोने लाखावर जाण्याचा अंदाज आहे.
गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस 3,000 डॉलर्सच्या पुढे गेला असून देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने प्रति 10 ग्रॅम 91 हजार 464 रुपयांवर उडी घेतली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केल्याने बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पाच वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडले
2021 – 48 हजार 720 रुपये प्रतितोळा
2022 – 52 हजार 670 रुपये प्रतितोळा
2023 – 65 हजार 330 रुपये प्रतितोळा
2024 – 77 हजार 913 रुपये प्रतितोळा
2025 – 91 हजार 464 रुपये प्रतितोळा
ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांमुळे जागतिक व्यापारासाठी धोकादायक संकेत मिळत असून सोने या व्यापार युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक तज्ञांनी जगात मंदी येण्याची शक्यता वर्तवल्याने सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
चांदीनेही भाव खाल्ला
चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून चांदीचे दर प्रतिकिलो एक लाखावर पोहोचले आहेत. बाजारात 96 हजार 700 रुपये प्रतिकिलो दर असणाऱ्या चांदीच्या दरात तब्बल 3 हजार 800 रुपयांची वाढ झाली आहे. हे दर आणखी वाढणार असल्याने ग्राहकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.