
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील जुन्या उपकरप्राप्त इमारतीमधील 100 पात्र भाडेकरू आणि रहिवाशांना घरांचे वितरण करण्यासाठी एप्रिलमध्ये संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या या रहिवाशांचा हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू किंवा रहिवाशांना निष्कासन सूचना देऊन इमारत खाली करण्यात आली आहे व त्यांच्या मूळ इमारतीचा विविध कारणामुळे पुनर्विकास शक्य नाही. अशा रहिवाशांना घर देण्यासाठी मास्टर लिस्ट सोडत काढण्यात येते. त्यासाठी म्हाडातर्फे रहिवाशांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जातात. रहिवाशांकडून आलेले अर्ज संबंधित वॉर्डला पाठवून अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जातो. त्यानंतर मास्टर लिस्ट कमिटीच्या बैठकीत रहिवाशांच्या पात्रतेसंदर्भात निर्णय घेतला जातो.
मास्टर लिस्टमधील 100 पात्र रहिवाशांची सोडत काढण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून वॉर्डमधून रिपोर्ट मागवण्याचे आणि रहिवाशांना वितरण करण्यासाठी उपलब्ध घरांचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पहिल्या सोडतीमधील विजेत्यांच्या नशिबी वेटिंग
28 डिसेंबर 2023 रोजी म्हाडाने 265 रहिवाशांसाठी पहिली मास्टर लिस्ट सोडत काढली होती. पुनर्पडताळणीत 265 पैकी 212 विजेते पात्र ठरले. त्यापैकी स्वीकृतीपत्र सादर केलेल्या 158 विजेत्यांना गतवर्षी जुलैमध्ये देकारपत्र देण्यात आले होते. आतापर्यंत केवळ 30 ते 40 जणांना घराचा ताबा मिळाला आहे.