
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी होळीच्या कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱयाला ‘ठेका धर नाही तर निलंबित केले जाईल’ असे सांगून नाचायला भाग पाडले. यावरून बिहारचे राजकारण तापले असून नितीश कुमार यांच्या जदयूने लालू यादवांच्या पुत्राचा या विधानावरून समाचार घेतला. तेजप्रताप यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. ते त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी होळी साजरी करत असताना पोलिसाला धमकावताना दिसतात.
तेजप्रताप पोलीस कर्मचाऱयाला सांगतात की, शिपाई दीपक एक गाणं लावू त्याच्यावर तुम्हाला ठेका धरावा लागेल. ठीक आहे? बुरा मत मानो, होली है. आज ठेका धरला नाही तर निलंबित केले जाईल. बुरा मत मानो, होली है. तेजप्रताप यांच्या या सूचनेनंतर ते गातात आणि पोलीस कर्मचारी ठेका धरतो. या घटनेचा दाखला देत राजदच्या विरोधकांनी तेजप्रताप यांच्यावर बोचरी टीका केली.