दिल्लीत भाजप नेत्याकडून इफ्तार पार्टी; केंद्रीय मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच सामील, यालाच म्हणतात मूँह में राम…

भाजपचे सध्याचे धोरण म्हणजे ‘मूँह में राम, बगल में छुरी’ असेच आहे. सध्या भाजप नेते औरंगजेबावरून कंठशोष करीत असतानाच दिल्लीत मात्र भाजप नेत्याने ठेवलेल्या इफ्तार पार्टीत केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत झाडून सारे नेते सामील झाले. दस्तरखानवर बसून या भाजप नेत्यांनी खजूरचा स्वादही घेतला.

सध्या देशात भाजप नेत्यांनी मोगल शासक औरंगजेबावरून रान पेटवले आहे. महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी भाजपमधूनच होत आहे. एकूणच भाजप सध्या मुस्लिम विरोधाचे नगारे वाजवत असतानाच दुसरीकडे दिल्लीतील भाजप नेत्या तसेच दिल्ली हज कमिटीच्या अध्यक्ष कौसर जहाँ यांनी शनिवारी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, कॅबिनेट मंत्री प्रवेश वर्मा, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता, भाजप नेते शाहनवाज हुसैन, मुस्तफाबादचे भाजप आमदार मोहनसिंह बिश्त, खासदार कमलजीत सहरावत, जफर इस्लाम आदी झाडून सारे भाजपचे पदाधिकारी सामील झाले होते.

इफ्तार पार्टीत सहभागी झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा सामाजिक सद्भाव घेऊन देशाने पुढे जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमदार मोहन सिंह बिश्त यांनी जात, धर्म वेगळा असला तरी आम्ही सर्व एकच आहोत असा संदेश इफ्तार पार्टीतून जात असल्याचे म्हटले.