तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू, पोहण्याचा बेत जिवावर बेतला

धुळवळीनंतर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा खोल पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात घडली. मृत्यू पावलेले पाच मित्र चिमूर तालुक्यातील साठगाव-कोलारी येथील आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या दुर्दैवी घटनेने जिह्यात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱया साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण आज दुपारचा सुमारास आले होते. त्यांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाचही जण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मच्छीमारांची मदत घेत बुडालेल्या पाच तरुणांचा शोध सुरू केला. अखेर बुडालेल्या पाच तरुणांचे मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले.

नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला…

घोडझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आर्यन इंगोले हा तरुण सोबतीला होता. या दुर्दैवी घटनेत आर्यनने कसेबसे स्वतःला बुडाण्यापासून वाचविले. त्याने डोळय़ादेखत पाच मित्रांना बुडताना बघितले. या घटनेने तो पुरता हादराला. त्याने स्वतःला सावरत पोलिसांना घटनेची माहिती दिली.