लोअर परळमध्ये क्रिकेटचा थरार; देविदास खेडेकर स्मृती चषकाला दिमाखात सुरुवात

स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय विमा कर्मचारी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी या सर्वात मोठय़ा विमा कंपनीच्या कर्मचाऱयांसाठी देविदास खेडेकर स्मृती चषक मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आयोजित केले जाते. या दोनदिवसीय क्रिकेट सामन्यांना शनिवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार असून त्यांना विविध पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय विमा कर्मचारी सेना सरचिटणीस दिनेश बोभाटे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे 38 वे वर्ष असून हे मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने 15 आणि 16 मार्च रोजी वेस्टर्न रेल्वे ग्राऊंड, फिनिक्स मॉलसमोर, लोअर परळ येथे पार पडणार आहेत. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन शनिवारी न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका गिरीजा सुब्रमण्यम मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडले. न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीतील सर्व कर्मचारी व अधिकारी मोठय़ा संख्येने या स्पर्धेसाठी एकत्र येतात. न्यू इंडिया आस्थापनातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती लाभणार आहे.