
पंजाबमधील अमृतसरच्या खंडवाला परिसरात असलेल्या ठाकूरद्वारा मंदिरावर शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ग्रेनेड हल्ला केला. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी मंदिरावर स्फोटके फेकली. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी सांगितले. हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनेवेळी मंदिरात पुजारी होता, तो सुदैवाने थोडक्यात बचावला.
दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी आप सरकारवर भाजप, काँग्रेस आणि शिरोमनी अकाली दल पक्षाकडून टीका केली जात असून केंद्रीय मंत्री रणवीर सिंह बिट्टू यांनी सुरक्षेतील हयगय प्रकरणी आप सरकारला टार्गेट केले आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला रात्री दोन वाजता या घटनेची माहिती मिळाली. सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दररोज पाकिस्तानी एजन्सी गरीब कुटुंबातील तरुणांना अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त करत आहेत. मागील अनेक प्रकरणांमध्ये असेच घडले आहे. त्यामुळे कोणाच्याही प्रभावाला बळी न पडता किंवा पैशाच्या लोभापोटी तरुणाईने चुकीचे पाऊल उचलू नये, याचे परिणाम त्यांनाही सहन करावे लागतात.
- हल्लेखोरांनी मंदिराच्या पहिल्या मजल्याचे मोठे नुकसान केले. पोलीस आणि मंदिर व्यवस्थापनाने नुकसान झालेल्या भागावर हिरवा पडदा टाकला आहे. कोणती स्फोटके फेकण्यात आली याचा पोलीस तपास करत आहेत. दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी मंदिरावर स्फोटके फेकताच काही क्षणात स्फोट झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.