
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत येथे 26 ते 30 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील हजारो नामांकित मल्ल उपस्थित राहणार असून कुस्तीवर प्रेम करणाऱया प्रत्येकासाठी ही स्पर्धा एक पर्वणीच ठरणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत 65 ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा झाल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र केसरी’ झालेल्या सर्वच मल्लांनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवला आहे. कर्जतमध्ये होणाऱया स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्यावर आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वप्रथम कुस्तीला राजाश्रय दिला. त्यांच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणि अलीकडच्या काळात तब्बल 40 वर्षे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुस्तीसाठी अनेक पथदर्शी व धोरणात्मक निर्णय घेऊन मल्लांना आधार देण्याचे काम केले. या स्पर्धेच्या समारोपाला शरद पवारदेखील उपस्थित राहणार आहेत.
कुस्तीच्या या स्पर्धेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी माझ्यासह माझ्या सहकाऱयांवर असून ती आम्ही पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडू आणि ‘महाराष्ट्र केसरी’च्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रकारे ही स्पर्धा यशस्वी होण्याचा प्रयत्न करू, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
मैदानाचे उत्साहात पूजन
या स्पर्धेसाठी मैदानाचे पूजन कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. यावेळी अॅड. प्रताप काका ढाकणे, ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त काका पवार, ‘हिंद केसरी’ अमोल बराटे, ‘महाराष्ट्र केसरी’ दत्ता गायकवाड, नवनाथ ढमाळ, बंकट यादव, संभाजी वरुटे, नितीन निंबाळकर, गावडे गुरुजी यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, कुस्ती क्षेत्रातील इतर मान्यवर, मल्ल, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
नऊशेहून अधिक मल्ल होणार सहभागी
राज्यभरातील सुमारे नऊशेहून अधिक मल्ल या स्पर्धेला उपस्थित राहणार असून कोणत्याही मल्लावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.