
सीमापार होत असलेल्या दहशतवादाच्या सरावाचे समर्थन करता येणार नाही, अशा शब्दांत हिंदुस्थानने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत खडेबोल सुनावले. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र सचिव तेहमीना जंजुआ यांनी जुन्या सवयीप्रमाणे जम्मू-कश्मीरबाबत चुकीची माहिती दिली. पण यामुळे त्यांच्या दहशतवादाचे समर्थन होणार नाही, असे संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानचे प्रतिनिधी, राजदूत पी. हरीश यांनी सांगितले.
हरीश यांनी इस्लामोपहबियाविरोधी दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या अनौपचारिक बैठकीत बोलताना पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानकडून वारंवार दिले जाणारे संदर्भ यामुळे त्यांचा दावा खरा होत नाही. तसेच त्यांच्या सीमापार दहशतवादाच्या सरावाचे समर्थन केले जाणार नाही. पाकिस्तानची मानसिकता जगजाहीर आहे, त्यांच्या कट्टरतेची नोंदही आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील हे वास्तव बदलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.