अभियंत्यांनी रात्रीही रस्त्यांच्या कामावर उपस्थित राहावे! अतिरिक्त पालिका आयुक्तांचे निर्देश

दिवसापेक्षा रात्रीचे तापमान कमी असल्याने मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट–काँक्रिटीकरणाची कामे रात्रीही सुरू आहेत. त्यामुळे रात्रीच्या कामावरही लक्ष ठेवण्यासाठी दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंत्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित राहावे, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. महापालिका अभियंते तसेच गुणवत्ता तपासणी संस्था, कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मुंबईत सुरू असलेली रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरणाची कामे पावसाळय़ाआधी पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी, मुंबई) तज्ञांचा चमू, गुणवत्ता तपासणी संस्थेचे (क्यूएमए) प्रतिनिधी फिल्डवर जाऊन आढावा घेत आहेत. या निरीक्षणांवर चर्चा करण्याबरोबर रस्ते कामांची गुणवत्ता, आव्हाने, अभियंत्यांच्या शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची विचारमंथन कार्यशाळा पवईतील आयआयटीत झाली. त्यावेळी अभिजित बांगर, आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्राध्यापक डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच ‘सिमेंट- काँक्रिट रस्त्याला पडणाऱया भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना’ यावर प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले.

रस्ते, सांधे भरण्याविषयी सविस्तर चर्चा 

ड्राय लीन काँक्रिट (डीएलसी) थराचा क्युरिंग कालावधी किती असावा, अरुंद रस्त्याचे काम सुरू असताना पायी वाहतूक, वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ते काम पूर्ण होण्याआधी पृष्ठभाग खरवडतो, त्याची दुरुस्ती कशी करावी, प्रसरण सांध्यांमधील कटिंग कसे करावे, मोठय़ा पात्याचे संयंत्र वापरताना कडापर्यंत ते पोहोचत नाही, त्यावेळी छोटय़ा पात्याचे संयंत्र वापरणे शक्य आहे का, या बाबींवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा झाली.