शहरातील अस्वच्छतेमुळे पंतप्रधान मोदींचा रस्ता बदलला

अमेरिकेच्या राष्ट्रीय राजधानीतील घाणीच्या मुद्द्यावर भाष्य करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खुलासा केला आहे. अमेरिका दौऱ्यावर आलेल्या मोदींसह इतर नेत्यांना वॉशिंग्टन येथील सरकारी इमारतीजवळचे तंबू, भिंतींवरील ग्रॅफिटी आणि रस्त्यावरील खड्डे दिसू नयेत अशी माझी इच्छा होती, असे ट्रम्प यांनी सांगितले. म्हणून व्हाईट हाऊसकडे येण्याचा या नेतेमंडळींचा रस्ता बदलला होता. याबरोबरच शहर स्वच्छ करण्याचे आदेशदेखील दिल्याचे ट्रम्प यांनी एका भाषणात बोलताना म्हटले. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. ट्रम्प म्हणाले की, आम्ही राजधानीची स्वच्छता करत आहोत. येथे गुन्हे होऊ देणार नाही आणि गुन्हे पाठीशीही घालणार नाही. शहरातील भिंतीवरील ग्रॅफिटी काढून टाकणार आहोत. यापूर्वीच तंबू काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष अशी काही मंडळी काही दिवसांपूर्वी भेटायला आली होती तेव्हा येथील अस्वच्छता आणि तंबू त्यांनी पाहू नये अशी माझी इच्छा होती.