
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱयांदा सत्ता आल्यापासून त्यांनी आक्रमक निर्णयांचा धडाका लावला आहे. विशेषतः बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा लावून धरून अमेरिकेने अनेक हिंदुस्थानींना हद्दपार केले. आता एजंटच्या माध्यमातून डंकी मार्गाने अमेरिका गाठणाऱयांनी एजंटांची माहिती दिली आहे. ईडीने पंजाब-हरयाणातील बनावट एजंटांची यादी केली असून अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले आहेत. त्यामुळे अनेक सरपंच आणि पुढाऱयांचे दाबे दणाणले आहेत.
ईडीने मायदेशात परतलेल्या जालंधर येथील 11 जणांची चौकशी केली. अधिकाऱयांनी सर्वांची त्यांच्या परदेशात जाण्याच्या मार्गाबद्दल विचारपूस केली. या चौकशीदरम्यान अनेक बनावट एजंटांची नावे समोर आली आहेत, जे पंजाब आणि हरयाणा येथील आहेत. पंजाब पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून काही ट्रव्हल एजंट्सविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, मात्र यापैकी एकालाही अटक झालेली नाही. ईडी आरोपी, त्यांचे एजंट आणि त्या बनावट एजंटपर्यंत तरुणांना पोहोचवण्यात मदत करणाऱयांचा शोध घेत आहे.
पंजाब आणि हरयाणामधील अनेक प्रकरणांमध्ये सरपंच आणि पुढाऱ्यांच्या माध्यमातून लोकांचा बनावट ट्रव्हल एजंटशी संपर्क झाला होता. या बनावट एजंटचा परदेशात काय संबंध आहे हे शोधण्यासाठी ईडीकडून तपास सुरू आहे. ईडीने अशा लोकांची यादी करत असून पैशांचे व्यवहार कसे झाले याचा तपास घेत आहे.
अमेरिकेला जाण्यासाठी 50-70 लाख
डंकी मार्गाने अमेरिकेला जाण्यासाठी एजंट 50 ते 70 लाख रुपयांची मागणी करतात. ही सरासरी किंमत 20 ते 50 लाख रुपये आहे, मात्र अधिक पैशांची मागणी करून एजंट पैसे उकळतो. तीन हफ्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते असे हिंदुस्थानात परतलेल्या काही अवैध स्थलातरितांना सांगितले होते. डंकी मार्ग सोयिस्कर असल्याचे सांगून फसवणूक केली जाते. प्रत्यक्षात नाना आव्हानांचा सामना करून अमेरिकेला नेले जाते.