
WPL 2025 ची चमचमती ट्रॉफी उंचावण्यासाठी मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 150 धावांच आव्हान दिल्लीला दिले होते. परंतु आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला दिल्लीचा संघ मुंबईच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा दिल्लीला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये पार पडलेल्या या फायनलमध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. पंरतु कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. नॅटने 28 चेंडूंमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या, तर हरमनप्रीतने 44 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 66 धावांची वादळी खेळी केली. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे मुंबईला 7 गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.